नागपूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री सक्तवसुली संचालनालय विभागाकडून सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. मात्र देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधकांनी रान पेटवले आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परमवीर सिंग बेपत्ता आहेत; मग अनिल देशमुख यांना अटक कशी काय झाली ? असा सवाल करत केंद्राच्या मदतीने परमवीर सिंग गुजरातमधून फरार झाले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलीस आयुक्त परमवीर सिंग सध्या बेपत्ता आहेत. आरोप करणारे सध्या बेपत्ता आहेत. मग ईडीकडून अनिल देशमुख यांना अटक कशी काय करण्यात आली ? सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. देशमुखांची अटक सूडबुद्धीने केलेली आहे. या अटकेचा मी जाहीर निषेध करतो, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
परमवीर सिंग यांचे शेवटचे लोकेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे दाखवत होते. परमवीर सिंग हे अहमदाबादमधून फरार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या फरार होण्यामागे कोणाचा हात आहे हे सांगण्याची गरज नाही. परमवीर सिंग केंद्राच्या मदतीने गुजरातमधून फरार झाले आहेत ही बाब हे ईडीला माहिती होती असे सांगून नाना पटोले यांनी केंद्राकडे मोठ्या तपास यंत्रणा आहेत. या यंत्रणेने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.