ऑलिंपिक रौप्यपदकविजेता रविकुमार दहियाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : प्रतिनिधी
टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनीगटात फ्रिस्टाईल कुस्तीचं रौप्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू रविकुमार दहियाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, ऑलिंपिकच्या सर्वच सामन्यांमध्ये रविकुमारनं चमकदार कामगिरी केली. दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारली. अंतिम फेरीत सुवर्णपदक हुकलं असलं तरी त्यानं जिंकलेल्या रौप्यपदकालाही सुवर्णझळाली आहे.
देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधवांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये जिंकून दिलं होतं. तिथून सुरु झालेला देशाच्या वैयक्तिक ऑलिंपिक पदकांचा प्रवास आज रविकुमार दहियापर्यंत येऊन पोहचला आहे. देशाच्या ऑलिंपिक पदकांचा प्रवास इथंच थांबणार नाही, यापुढे तो अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी रविकुमार दहिया आणि अन्य खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.