मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली बदनामी सोमय्या यांच्या अंगलट आली आहे. परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावले असून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोमय्या यांनी महाविकासआघाडीमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अशातच सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख प्रकरणात परब यांचा हात आहे. तसेच परब यांचे दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट असून परिवहन खात्यात मोठे घोटाळे असल्याचे आरोप सोमय्या यांनी केले होते. त्यासोबतच त्यांनी ट्विट करत अनिल परब यांचा संबंध रत्नागिरीमधील बांधकामाशी केला होता.
परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळत त्यांच्याकडून बदनामी होत असल्याचे सांगत ७२ तासांच्या आत ते ट्विट डिलिट करून विनाशर्त माफी मागण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र सोमय्या यांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावून २३ डिसेंबर रोजी उत्तर देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.