पुणे : प्रतिनिधी
परवानगी नसतानाही भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेत सत्कार करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि काही नगरसेवकांसह ३०० जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याच पायऱ्यांवर सत्कार करण्याचे भाजपने ठरवले होते. या सत्काराच्या कार्यक्रमावर काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप घेतला होता. पुणे महापालिका कार्यालयाच्या परिसरात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. या गर्दीला नियंत्रण करणे पोलीसांना आव्हान बनले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला होता.
पालिकेच्याबाहेर सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजरात घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा पोलिसांनी त्यांना बेकायदेशीर जमाव असल्याचे सांगत तेथून त्यांना जाण्यास सांगितले. तरीदेखील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून न जाता मोठमोठ्याने घोषणा केली.
कार्यकर्त्यांनी बंदी आदेश उल्लंघन, घोषणाबाजी आणि बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी गोंधळ घातला होता.
या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, प्रतीक देसरडा यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम १४३, १४५, १४७, १४९, ४२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(३) आणि १३४ अंतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.