मुंबई : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. राज्यातील खेडोपाडी, सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम त्यांनी केलं. स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र देत बहुजन, कष्टकरी समाजाच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्मवीर अण्णांचं योगदान मोलाचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित, संस्कारी नवी पिढी घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, कर्मवीर अण्णांनी जाती, धर्म, पंथ, वर्गाच्या भिंती तोडून शिक्षणाची दारं सर्वांना खुली करुन दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबीसारख्या समस्यांवर ‘शिक्षण’ हाच एकमेव आणि प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी ओळखलं होतं. त्यासाठी त्यांनी राज्यात शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे सुरु केली. गरीबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलं. त्यांचं शिक्षण अखंड सुरु रहावं यासाठी ‘कमवा आणि शिका’ सारखी योजना सुरु केली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी सुशिक्षित, सुसंस्कृत, नीतीवान, प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचं खुप मोठं काम केलं आहे. कर्मवीर अण्णांचं कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.