मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत क्रूझवर छापे टाकून करण्यात आलेली कारवाई संशयास्पद आहे. या कारवाईमध्ये एनसीबीसोबत भाजपाचे पदाधिकारी आणि काही खासगी व्यक्ती होते. या कारवाईत अटक झालेल्या आरोपींना त्यांच्या हातात का सोपवले गेले असा सवाल करत एनसीबी आणि भाजपाचा काय संबंध आहे याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले, गुजरातच्या मुंद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले आहेत. मात्र तेथे कारवाई झालेली नाही. परंतु एनसीबी मुंबईतील क्रूझ बंदरावर कारवाई करून काहीतरी मोठे केल्याचा वाव आणत आहे. एनसीबी क्रूझ येथे कारवाई करून मुंद्रा प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर पत्रकार परिषद घेत खुलासा करताना एनसीबीने मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्षित केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत झालेल्या क्रुझ कारवाईमध्ये नियम पाळले नाहीत. या कारवाईमध्ये जेवढे अधिकारी होते. त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. एनसीबी महासंचालकांनी तात्काळ त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.