Site icon Aapli Baramati News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राम खांडेकर यांना श्रद्धांजली

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे विशेष कार्य अधिकारी, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचे खाजगी सचिव म्हणून प्रदीर्घ काळ प्रशासकीय जबाबदारी सांभाळलेल्या श्री. राम खांडेकर साहेबांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात अनेक वर्षे काम करणारे अधिकारी म्हणून कितीतरी महत्वाच्या निर्णयांमध्ये खांडेकर साहेबांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक निर्णयप्रक्रियांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या, देशाच्या आजवरच्या गौरवशाली वाटचालीचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

राजकीय नेतृत्वाला यशाचं शिखर गाठता यावं, राजकीय नेतृत्वाचं काम प्रभावी होत रहावं, यामाध्यमातून राज्याचं, देशाचं, लोकांचं भलं व्हावं, या विचारानं, ध्येयानं राम खांडेकर साहेबांसारखे अधिकारी अहोरात्र झपाटून काम करत असतात. प्रशासकीय सेवेत त्यांचं मोलाचं योगदान असतं. त्यांचं निधन ही प्रशासकीय चळवळीचीही मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाषा विषयाचे अभ्यासक व लोकप्रिय साहित्यिक म्हणून राम खांडेकर यांनी केलेल्या कार्याचाही उपमुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

राम खांडेकर यांचे निधन

दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे विश्वासू सचिव आणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींचे साक्षीदार राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या राम खांडेकरांना दिल्लीतल्या राजकीय जीवनाचा ४० हून अधिक वर्षांचा जवळून अनुभव होता. स्व. यशवंतराव चव्हाणांपासून ते नरसिंह रावांपर्यंत दिल्लीतल्या दिग्गजांचे राजकारण अतिशय जवळून पाहण्याची त्यांना संधी मिळाली. यशवंतराव चव्हाणांचे स्टेनो म्हणून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला होता. त्यानंतर दीर्घकाळ यशवंतरावांचे पीए. मधल्या काळात मोहन धारियांचे पीए, वसंत साठे यांचे पीए असे काम करण्याची संधी त्यांना मिळाली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version