इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वीजपुरवठा त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर सकाळपासूनच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वीजपुरवठा चालू करण्यात येत नाही, तोपर्यंत माझे धरणे आंदोलन असेच चालू राहणार असल्याची भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे.
इंदापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडीत आहे. मात्र शेजारील तालुक्यात वीजपुरवठा चालू आहे; मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा अन्याय का केला जात आहे ? असा सवाल उपस्थित करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेला असतानाही तालुक्याचे आमदार वीज पुरवठा चालू करण्याबाबत एकही शब्द बोलत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. मी तुमचाच आहे, कोणत्याही अडचणी असल्यावर मी सोडवेल असे गोड बोलणाऱ्या भरणे यांना शेतकऱ्यांचे नुकसान का दिसत नाही ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने वीज बिल भरण्यास शेतकऱ्यांना सवलत द्यावी. सरकारने टप्प्याटप्प्याने विज बिल भरण्यास सवलत दिल्यास शेतकरी बिले भरण्यास सहकार्य करतील असेही पाटील यांनी नमूद केले आहे. मात्र जोपर्यंत इंदापूर तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हे चालू असलेले धरणे आंदोलन कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे.