देगलूर : प्रतिनिधी
आम्ही भाजपाच्या दादागिरीला शरण जाणार नाहीत. आमचं तोंड बंद करण्याची भाषा तुम्ही बोलूच नका. हा छगन भुजबळ कधीच बदलणार नाही. मीच नाही तर आमच्यापैकी कुणीच बदलणार नाही. कसली ईडी-बीडी घेऊन बसलाय. आपण सगळे हिमतीने उभे राहू अशी जोरदार फटकेबाजी करत अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला इशारा दिला आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ भुजबळ देगलूरमध्ये आले होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. जरंडेश्वर कारखान्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा तपशील जाहीर केला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची सगळी माहिती त्यांनी दिलेली असल्याचे सांगून भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील साखर कारखान्यांच्या घोटाळ्याची यादी वाचून दाखवत तुमच्या लोकांनी कोठे कोठे साखर कारखाने विकत घेतली याचे घोटाळे बाहेर काढा, असे खुले आव्हान दिले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावरही भुजबळ यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. हर्षवर्धन पाटील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. मध्यंतरी हर्षवर्धन पाटलांनी भाजपामध्ये आल्यापासून शांत झोप लागते असे जाहीर विधान केले होते. हर्षवर्धन पाटलांना भाजपामध्ये गेल्यावर सुखाची झोप लागते. तुम्ही कितीही भानगडी करा, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काहीच होत नाही हाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होत असल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होणाऱ्या गैरवापराबाबत भाष्य केले.