Site icon Aapli Baramati News

आता फक्त मोदींची खुर्ची विकणे बाकी आहे : मेधा पाटकर यांचा भाजपावर हल्लाबोल

ह्याचा प्रसार करा

नाशिक : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपपक्ष प्रत्येक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून खाजगी कंपन्या आणि ठेकेदारांना पोसण्याचे काम करत आहे. आता फक्त मोदींची खुर्ची विकणे बाकी आहे, अशी खोचक टीका ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे.

गंजमाळ येथे महाराष्ट्र  इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या.  सत्ताधाऱ्यांच्या खासगीकरणाच्या माध्यमातून चाललेला राजकारणाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. खाजगीकरण करून त्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाचा लाभ घेण्याचे काम भाजपकडून  चालू असल्याचा आरोप करून मेधा पाटकर म्हणाल्या,  ठेकेदारांच्या जीवावर २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा या लोकांचा उद्देश आहे. ठेकेदारांचे भले करायचे. मात्र कामगारांची यांना चिंता नाही. यांना फक्त खोटी आश्वासने देणे जमतात.  बेरोजगारी निर्माण करणे हेच त्यांचे कार्य आहे.

वीज, विमान, पाणी, रेल्वे, आरोग्य अशा विविध विभागात खासगीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. मात्र या खासगीकरणाचा परिणाम कामगार वर्गावर होत आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचा त्रास सोसावा लागत आहे. या खासगीकरणामुळेच कोरोना काळात ऑक्सीजनअभावी अनेकांना जीव गमवावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. कृषि क्षेत्रातही त्यांनी आता खासगीकरणाचा विषाणू घुसवला आहे. याला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मेधा पाटकर यांनी नमूद केले. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे.  पाटकर यांनी या बंदचे समर्थन करत या निर्णयाचे स्वागत केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version