Site icon Aapli Baramati News

आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद : देवेंद्र फडणवीस यांची टीका

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून पुकारलेला बंद हा शेतकर्‍यांच्या संवेदनशीलतेसाठी नाही.  आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज्य सरकारकडून हा बंद ठेवण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून दमदाटी करून हा बंद पाळण्यास सांगितले जात आहे. हा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद  असल्याची टीका, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचारावर हे सरकार गप्प बसले आहे. मात्र उत्तरप्रदेशमधील घटनेवर महाराष्ट्र बंद केला जातोय. हा बंद शासन पुरस्कृत दहशतवाद आहे. सरकारला थोडी लाज असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर केलेल्या घोषणा हवेत विरल्या गेल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचे ढोंग करत आहे. हे  वसुली सरकार असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

आजच्या बंदला न्यायालयाकडून बंदी असतानाही बंदची हाक दिली गेली. हा न्यायालयाचा अवमान आहे. आजच्या या बंदमध्ये बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारकडून  आणि प्रशासनाकडून हा केलेला नियोजित कार्यक्रम आहे. आज झालेल्या तोडफोडीची सरकारने भरपाई द्यायला हवी, अशी मागणी करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याऐवजी बिघडवण्याचा  निर्णय मंत्रिमंडळात घेतला जात आहे. देशाच्या  इतिहासातील मंत्रिमंडळाचा इतका दुरुपयोग कोणीच केला नाही. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version