पुणे : प्रतिनिधी
बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले आहे. दरम्यान, आरटीओ विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं या संघटनेने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडं घातलं आहे.
बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी काल बघतोय रिक्षावाला संघटनेने आरटीओ कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. मात्र त्यास आरटीओ कार्यालयाचा कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे या संघटनेने आक्रमक पवित्रा घेत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या संघटनेने बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बघतोय रिक्षावाला या संघटनेने ‘दादा मला वाचवा’ अशा पद्धतीचे पोस्टर लावून एक अनोखं आंदोलन केले होते. त्यावेळीही अजित पवार यांना त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यावेळी अजित पवारांनी बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.