
पुणे : प्रतिनिधी
एखाद्याचं नशीब जोरावर असेल तर त्याला बरंच काही मिळतं असं म्हटलं जातं. त्यामुळंच अनेकजण नशिबाचा दाखला देत असतात. असंच काहीसं पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या बाबतीत घडलं आहे. सोमनाथ झेंडे यांनी ‘ड्रीम ११’ या ऑनलाईन गेम अॅपवर तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी मागील तीन महिन्यांपासून ड्रीम ११ या अॅपवर टीम बनवायला सुरू केली होती. या दरम्यान, बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यासाठी त्यांनी या अॅपद्वारे टीम बनवली. सामना संपल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल तपासला. त्यामध्ये त्यांनी बनवलेली टीम पहिल्या क्रमांकावर आली होती. त्यातून त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
हे बक्षीस जिंकल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी आनंद व्यक्त केला. त्याचवेळी अशा गेम्सपासून सावध राहिलं पाहिजे आणि आर्थिक नुकसान होणार नाही यांची खबरदारी घ्यायाला हवी असेही त्यांनी म्हटलं आहे. सोमनाथ झेंडे यांच्या कुटुंबियांसाठीही ही आनंदाची गोष्ट ठरली आहे. एकाच रात्रीत झेंडे हे करोडपती झाले आहेत. त्यांनी बक्षिसाच्या रकमेतून काही रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी वापरणार असल्याचं सांगितलं आहे.