डोर्लेवाडी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ईगल स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मेखळी येथील भैरवनाथ क्रीडा मंडळ संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
डोर्लेवाडी येथील ईगल स्पोर्ट क्लब संघाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, माजी संचालक भगवान क्षीरसागर, तंटामुक्त अध्यक्ष काकासाहेब शिंदे, जितेंद्र काटे, नानजी बाबर, दादासाहेब दराडे, रामभाऊ कालगावकर, अविनाश काळकुटे, विनोद नवले, मिलिंद घोरपडे, ईगल स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष बापूराव गवळी, उपाध्यक्ष हनुमंत मदने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ३४ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक ईगल स्पोर्ट क्लब डोर्लेवाडी, तृतीय क्रमांक सोनेश्वर क्रीडा मंडळ सोनगाव व चतुर्थ क्रमांक राणाप्रताप क्रीडा मंडळ झारगडवाडी यांनी मिळविला. उत्कृष्ट चढाई प्रतिक साळे, उत्कृष्ट पकड ओम चव्हाण आणि कृष्णा गाडेकर याला सामन्याचा मानकरी म्हणून पुरस्कार मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बापू साळे, आदित्य गोरे, नाना काळकुटे, गणेश मदने, नितीन जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. अमोल जाधव, बापू जाधव, सचिन लोणकर यांनी स्पर्धेचे नियोजन केले.