अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात भारताचा ६ गडी राखून विजय झाला आहे. हा भारताचा १००० वा एकदिवसीय सामना होता, त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांपैकी सर्वाधिक धावा जेसन होल्डर याने ५७ धावा केल्या. कर्णधार पोलार्डला खातेदेखील उघडता आले नाही. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ ओव्हरमध्ये गारद झाला.
भारताला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान होते. या सामन्यात युझवेंद्र चहलने ९.५ ओव्हर टाकल्या. त्यामध्ये त्याने एकूण ४९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या विकेटबरोबर त्याने एक दिवसीय क्रिकेटमधील शतक पूर्ण केले आहे. वॉशिंग्टन सुंदर ३ विकेट , प्रसिध कृष्णा २ विकेट आणि मोहम्मद सिराज ने १ विकेट घेतली.
त्यानंतर १७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी सलामीला मैदानात उतरली. यामध्ये रोहित शर्माने ६० धावा, ईशान किशनने २८ धावा, विराट कोहलीने ८ धावा, रिषभ पंतने ११ धावा केल्या. त्याचबरोबर सुर्यकुमार यादव नाबाद ३४ धावा आणि दिपक हुडा नाबाद २६ धावा केल्या. त्यांच्या या नाबाद खेळीने भारताचा विजय झाला.