
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीहून घरी परतत असताना भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला आज सकाळी अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेनजीक झालेल्या या भीषण अपघातात ऋषभ पंत याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मेडीकल बुलेटीन जारी करत माहिती दिली असून ऋषभला सर्व ती मदत केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
आज सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत हा दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून जात होता. नरसन शहराजवळ पोहोचल्यानंतर नियंत्रण सुटल्यामुळे रेलिंग, खांब तोडून कार पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका पत्रकाद्वारे ऋषभ पंत याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. यामध्ये रिषभच्या कपाळावर दोन व्रण आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्याला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाली असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्याच्या पाठीवर किरकोळ जखमा झाल्या असून घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. सध्या त्याला डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर विशेष वैद्यकीय पथक ऋषभवर उपचार करत आहे. संबंधित पथक आणि कुटुंबीयांशी बीसीसीआय संपर्कात असून त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल असेही बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.