Site icon Aapli Baramati News

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; खेळांसाठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदकं जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा येथे होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबुराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडू, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणाले की, सहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला, पदकांची अपेक्षा आहे. मात्र अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं, राज्यातल्या साडेतेरा कोटी नागरिकांच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मागच्या वेळी, ३६ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी आपण, ८०० खेळाडू-अधिकाऱ्यांचं पथक पाठवलं होतं. त्यावेळी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य, ८३ ब्रॉन्झ अशी १४० पदकं मिळाली होती. यावेळी आपलं पथक मोठं आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ३६ व्या क्रीडा स्पर्धेपेक्षा, ३७ वी क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदकं मिळवून देणारी, राज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. ९ नोव्हेंबरला स्पर्धा संपवून आपले खेळाडू परत येतील, त्यावेळी बहुतेकांच्या गळ्यात, राष्ट्रीय पदकं असतील.महाराष्ट्रानं सर्वांधिक पदकं जिंकून, पहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण सर्वजण पुन्हा एकत्र येऊ, असा विश्वास उपमुख्यंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथं राज्याला मान खाली घालावी लागेल अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथं घडणार नाही. डोपिंगसारखे प्रकार घडणार नाहीत. खिलाडूपणाला डाग लागेल असं काहीही महाराष्ट्राचे खेळाडू करणार नाही, याची शपथ, काळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातून, खिलाडूपणातून, वागण्यातून, क्रीडारसिकांची मनं जिंकण्याचं काम करावं. राज्यासाठी पदकं जिंकणं आणि खिलाडूपणे वागणं, या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत, याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

महाराष्ट्रानं सुरुवातीपासून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारलं आहे. गावागावात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी राज्याचं स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडा संकूल असलं पाहिजे. खेळाडूंना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, महामंडळांच्या सेवेत, खाजगी कंपन्यांमध्येही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठीही शासनाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांना चांगले यशही मिळत आहे, असेही उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्वल कामगिरी

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या, १९ व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं, २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ ब्राँझ, अळी एकूण १०७ पदकं जिंकली. यात महाराष्ट्राचं मोलाचा, महत्वाचं योगदान होतं.  आशियाई स्पर्धेत भारतानं जिंकलेल्या २८ सुवर्णपदकांपैकी १५ सुवर्णपदकं महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. यशिवाय महाराष्ट्राला ७ रौप्य, ५ कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचं काम यापुढच्या काळात, राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचं आहे, याची जाणीव ठेवून तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगलं खेळलं पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षिसात भरघोस वाढ

राज्यसरकार सातत्यानं खेळ आणि खेळाडूंच्या पाठीशी राहीलं आहे. चीनमधल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या, राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रूपयांचं आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षिस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा जीआर काढला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रूपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचं रोख बक्षिस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना, चांगली तयारी करता यावी म्हणून, प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन उभारण्यात येत आहे. अलिकडच्या काळात जलतरण, नेमबाजी सारख्या खेळातंही महाराष्ट्राचे खेळाडू चमकत आहेत. जागतिक पातळीवर भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या पूर्वजांचे संबंधही महाराष्ट्राशी जोडलेले आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी, इथल्या क्रीडा संस्कृतीची मुळं अधिक घट्ट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंना सन्मान आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version