Site icon Aapli Baramati News

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय!

ह्याचा प्रसार करा

ब्रिस्बेन कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर मात करत चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.


ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर तीन विकेट्सनी मात केली. चौथ्या कसोटी सामना खिशात घालत भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही गवसणी घालती आहे. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. 

हा कसोटी सामना असला तरी भारतीय संघ दुसऱ्या डावात वन डे सामन्याप्रमाणेच फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. परंतु युवा फलंदाज शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही 24 धावा करुन माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतला हाताशी घेत संयमी फलंदाजी केली. 56 धावा करुन तोही माघारी परतला. यानंतर रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. जिंकण्यासाठी दहा धावांची गरज असताना सुंदर 22 धावा करुन बाद झाला. यानंतर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर (2 धावा) माघारी परतला. मग रिषभ पंतने (89 धावा) ने विजयी चौकार लगावला आणि सामन्यासह मालिका खिशात घातली.  

ऑस्ट्रेलियन संघासाठी ब्रिस्बेनचं गाबा मैदान एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाला त्या मैदानात पराभूत करणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं होतं. कारण 1988 पासून ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात कधीही पराभूत झालेला नव्हता. शिवाय सुरुवातीला क्वॉरन्टीनमुळे जेव्हा भारतीय संघाने इथे खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनमधली कामगिरी शानदार आहे, त्यामुळेच भारतीय संघाला इथे खेळायचं नाही. परंतु, 19 जानेवारी 2021 हा दिवस ऑस्ट्रेलियाच्या गर्वहरणाचा ठरला.    



ह्याचा प्रसार करा
Exit mobile version