आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजन

काऊच फिल्म फेस्टीवलमध्ये संदिप पाठकने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मराठमोळा अभिनेता संदीप पाठक याने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॅनडातील टोरोंटो येथे जागतिक दर्जाचा ‘काऊच फिल्म फेस्टिवल स्प्रिंग २०२२’ पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संदीप पाठक याला मिळाला आहे. ‘राख’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संदीप पाठकसोबत या पुरस्कारासाठी नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो  डि लुका हे दोन  अभिनेते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत होते. या दोघांनाही त्याने मागे सारत या पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले आहे. संदीप पाठकने आजपर्यंत हरिश्चंद्राची फॅक्टरी, रंगा पतंगा, एक हजाराची नोट आणि ईडक यांसारख्या ५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

विविध नाटकांचे तब्बल अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि २५ पेक्षाही जास्त टीव्ही शो केले आहेत. हा पुरस्कार जरी मिळाला असला तरी हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. या चित्रपटाच्या टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे. त्यामध्ये साकारलेली भूमिका माझ्या आजपर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला याचा मला खूप आनंद खूप वेगळा आहे. चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही पोचपावती असल्याची प्रतिक्रिया संदीप पाठक याने व्यक्त केली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन
Back to top button
Contact Us