पुणे : प्रतिनिधी
हिंदी व मराठी सिनेसृष्टीत अनेक भुमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. मागील १७ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यातच जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. याचदरम्यान, त्यांच्या निधनाची अफवाही पसरली होती. आज दुपारी त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. त्यातच उपचारांनाही ते प्रतिसाद देत नव्हते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
३० ऑक्टोबर १९४७ रोजी विक्रम गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी आपले नैपुण्य दाखवले होते. ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘लपंडाव’, ‘माहेरची साडी’, ‘नटसम्राट’, ‘ज्योतिबाचा नवस’ यासारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांसह ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘वजीर’, ‘हम दिल दे चुके सनम’ यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या.