मुंबई : प्रतिनिधी
आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
‘जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींचे कान तृप्त करणारे अलौकीक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘ असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर जवळपास महिनाभर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले.
संगीतविश्वावात त्यांची ‘ लतादीदी’ म्हणून ओळख होती. त्यांनी ९८० पेक्षाहून अधिक हिंदी चित्रपटाची गाणी गायली आहेत. त्याचबरोबर २० पेक्षा अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. २००१ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.