कोल्हापूर : प्रतिनिधी
नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटलं की गोंधळ आणि राडा आलाच.. त्यामुळं अनेकदा गौतमीचे कार्यक्रम चर्चेत असतात. अशातच आता कोल्हापूरमध्ये आयोजित गौतमीच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात होणारे दोन कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात पोलिसांवर ताण असतो. त्यामुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
गौतमी पाटील ही आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध आहे. तिचा कार्यक्रम म्हटलं की मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. मात्र याच कार्यक्रमात अतिउत्साही लोकांकडून धांगडधिंगा घातला जात असल्यामुळे अनेकदा या कार्यक्रमाला गालबोट लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सध्या गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम पार पडत असताना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशीवडे आणि करवीर तालुक्यातील नंदगाव येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील मनोरंजन विभागाने आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. तसे पत्रही आयोजकांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे तूर्तास तरी गौतमी पाटीलला कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो एंट्री’च असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.