Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या फिर्यादीवरून रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिस ठाण्यात एडलवाईज कंपनीच्या संचालकांसह पांच जणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. नितीन देसाई यांनी व्यावसायिक कारणांसाठी सीएफएम कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांच्याकडून २०१६ आणि २०१८ या वर्षात दोन वेगवेगळे करार करण्यात आले होते. या कर्जापोटी देसाई यांनी आपली तीन ठिकाणी असलेली  जवळपास ४२ एकर जमीन तारण म्हणून ठेवली होती. या दरम्यान, हे कर्ज सीएफएम कंपनीकडून एडलवाईज कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले होते. कोरोना काळात एनडी स्टुडिओला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आर्थिक उत्पन्नही घटले होते. परिणामी कर्जाची रक्कम वाढत गेली.

दरम्यान, देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपले पती नितीन देसाई यांना कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिला जात होता, त्यांना सातत्याने मानसिकदृष्ट्या छळले जात होते. त्यामुळेच त्यांनी या सर्व त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ईसीएल फायनान्स, एडलवाईज कंपनीच्या संचालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३०६ आणि ३४ नुसार दाखल करण्यात आला आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version