Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; कर्जतच्या एनडी स्टुडिओत केला जीवनाचा शेवट..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि प्रयोगशील कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केला. ते ५८ वर्षांचे होते.

याबाबत माहिती अशी की, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघड झाली. आज सकाळी एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना नितीन देसाई हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. याबाबत कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नितीन देसाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्यदिव्य सेट उभं करण्यात नितीन देसाई यांची हातोटी होती. चित्रपटांना शुटींगसाठी त्यांनी आपल्या कर्जत येथे एनडी स्टुडिओ उभारला होता. मुंबईतील जेजे कला महाविद्यालयात प्रकाश चित्रणाचे शिक्षण पूर्ण केलेल्या नितीन देसाई यांनी १९८७ साली चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. तेव्हापासून आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्यदिव्य सेट उभारण्याचं काम केलं.

‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटानं नितीन देसाई यांना प्रकाशझोतात आणलं. हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो अशा अनेक सिनेमांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं. आतापर्यंत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी मिळवला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version