अहमदनगर : प्रतिनिधी
नृत्यांगना गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. जसं तिचं नृत्य हा चर्चेचा विषय असतो, तसंच तिच्या कार्यक्रमातील गोंधळही कायम चर्चिला जातो. अशातच आता थेट गौतमीवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे गौतमीचा कार्यक्रम घेतल्यामुळे संबंधित मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतमी पाटील, तिचा व्यवस्थापक अशोक खरात, कार्यक्रमाचे आयोजक मृत्युंजय प्रतिष्ठान व एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे आणि हर्षल किशोर भागवत यांच्यावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाने गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला पोलिस आणि प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती.
परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन करून रहदारीस अडथळा निर्माण केल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १८८, २८३, ३४१, ३४ या कलमांसह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २,१५, तसेच ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० च्या कलम ३, ४, ५, ६ आणि मुंबई पोलिस कायदा कलम क ३७ (१) (३)/१३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.