Site icon Aapli Baramati News

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ही’ रक्कम परत; उदय सामंत यांनी दिले आदेश

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

विविध अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम परत केली जात नसल्याची तक्रार शासनाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयांनी तातडीने ही रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. या प्रवेशादरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठे त्यांच्याकडून विविध शैक्षणिक गोष्टींसाठी अनामत रक्कम घेत असतात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठांना रक्कम परत करणे बंधनकारक असते. परंतु ही रक्कम देण्यास महाविद्यालय आणि विद्यापीठ टाळाटाळ करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड सहन करावी लागते.

विद्यार्थ्यांकडून दरवर्षी क्रीडा साहित्य, ग्रंथालयातील पुस्तके,  प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी यांसारख्या गोष्टींसाठी हजारो रूपये अनामत रक्कम घेतली जाते. महाविद्यालय आणि विद्यापीठांकडे उपलब्ध असून ती देण्यास टाळाटाळ करत असतात. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता.

त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना अनामत रक्कम तातडीने परत करण्याचे निर्देश महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी देण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले आहे. या निर्णयामुळे संपुर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version