Site icon Aapli Baramati News

…तर येतील काँग्रेसला अच्छे दिन : ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा सल्ला

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसने आता स्वतःला दुबळे किंवा कमकुवत न समजता जिथे प्राबल्य कमी तिथे अधिक ताकद लावून काम करावं. भाजप ज्या पद्धतीने निती वापरत आहे त्या पद्धतीने काम केल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील, असा सल्ला काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी आणि ज्या राज्यांमध्ये सत्ता गेलीय ती पुन्हा मिळवायची असेल तर भाजपाप्रमाणे मोठा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आपण खूप लहान पक्ष झालो आहोत किंवा आपण खूप दुबळे आहोत असा ‘निराशावादी दृष्टीकोन’ काँग्रेसने बाळगता कामा नये. अशा निराशावादी दृष्टीकोनातून काँग्रेसला गमावलेल्या राज्यांमधील सत्ता पुन्हा मिळवता येणार नाहीत, असंही खुर्शीद म्हणालेत.

पीटीआयशी बोलताना त्यांनी काँग्रेसला भाजपाचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला.”मी पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांमधून एक गोष्ट शिकलो आहे. ती गोष्ट म्हणजे तुम्ही खूप लहान पक्ष झाला आहात किंवा दुबळे आहात किंवा एखाद्या प्रदेशात अथवा राज्यामध्ये तुम्ही काही मोठी कामगिरी करु शकत नाही असा विचार ठेवणं चुकीचं आहे.” असं खुर्शीद म्हणालेत.

“माझ्या मते, ज्या ठिकाणी भाजपाचं काहीच अस्तित्व नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी असं (मोठा विचार करण्याची रणनीति आखण्याचं) धोरण राबवलं. ज्या ठिकाणी आजही भाजपाचं अस्तित्व नाहीय त्या ठिकाणीही त्यांनी असा प्रयत्न केल्याचं दिसून आलं,” असं खुर्शीद भाजपाच्या कामगिरीसंदर्भात म्हणाले. “काँग्रेसनेही निराशावादी दृष्टीकोन स्वीकारता कामा नये. आधीच खूप राज्यांमधील काँग्रेसची सत्ता गेली आहे. काँग्रेस येथे पुन्हा सत्ता मिळवू शकते. जर आपल्याल हे करायचं असेल तर आपल्याला भाजपाप्रमाणे मोठा विचार करावा लागेल. प्रतिबद्धता आणि विश्वास या दोन गोष्टींच्या जोरावर काँग्रेस हे करु शकते. पक्षाने हेच केलं पाहिजे,” असंही खुर्शीद म्हणाले. म्हणजेच पक्षाने जिथे त्यांची आत्ता सत्ता नाहीय तिथेही पूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्याबरोबरच राजकारणामध्ये उतरण्याची गरज आहे, असे संकेत खुर्शीद यांनी दिलेत.

पश्चिम बंगालमधील जनतेने नियोजनपूर्वक पद्धतीने मतदान केल्याने डावे आणि काँग्रेसचा राज्यातून सुपडा साफ झाल्याचंही खुर्शीद यांनी मान्य केलं. काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट आणि आसाममध्ये एआययूडीएफसोबत युती केल्याने पक्षाचा फटका बसल्याचं मत काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं. याच पार्श्वभूमीवर खुर्शीद यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी, “जेव्हा तुम्हाला यश मिळत नाही तेव्हा तुम्ही असं स्पष्टीकरण देता. निवडणूक होऊन गेल्यानंतर अशी वक्तव्ये करण्यात काही अर्थ नाहीय असं मला वाटतं. यामधून तुम्हाला भविष्यात निर्णय घेण्याचा धडा आणि त्यासंदर्भातील इतर अनुभव मिळाले नाहीत तर अशा व्यक्तव्यांचा काहीच उपयोग नसतो. यामधून तुम्ही शिकता की नाही हे महत्वाचं आहे. दोन्ही बाजूने अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत, हेच सध्या दिसून येत आहे,” असं सांगितलं.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version