पुणे : प्रतिनिधी
सोनोग्राफी सेंटरचा अनियमितता अहवाल न पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमित सरदेसाई याला पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सोनोग्राफीचा नियमित अहवाल वैद्यकीय अधीक्षकांना पाठवावा लागतो. परंतु तक्रारदाराच्या सोनोग्राफीचा अहवाल अनियमित होता. त्यामुळे अनियमित अहवाल न पाठवण्यासाठी अमित सरदेसाई यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी दहा हजार रुपये देण्यास नकार दिला. शेवटी तडजोड करून रक्कम पाच हजार रुपये ठरली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले.
तक्रारदारकडून अमित सरदेसाई यांना पाच हजार रुपये लाच घेत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.