Site icon Aapli Baramati News

दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत संपली; अजूनही तुमच्याकडे त्या नोटा असतील तर आता एकच पर्याय…!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची अथवा बदलून घेण्याची मुदत आता संपली आहे. मात्र अजूनही तुम्ही दोन हजारांच्या नोटा बदलल्या नसतील तर घाबरू नका. कारण, मुदत संपल्यानंतर देखील तुम्ही या नोटा बदलून घेऊ शकता.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ७ ऑक्टोबरपासून कोणतीही बँक दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार नाही. मात्र तरीही या नोटा कायदेशीर राहणार आहेत. त्यामुळे आतादेखील तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील तर तुम्ही त्या बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेट द्यावी लागेल. देशात रिझर्व्ह बँकेची एकूण १९ क्षेत्रीय कार्यालये आहेत. यातील कोणत्याही एका कार्यालयात जाऊन किंवा पोस्ट ऑफिसतर्फे पाठवून तुम्हाला या नोटा बदलता येतील.

महत्त्वाची बाब म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क स्वीकारणार नाही. बँकेच्या नियमानुसार कोणतीही संस्था किंवा व्यक्ती २० हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकते किंवा बदलून घेऊ शकते. त्यामुळे सध्या नोटा शिल्लक असतील तर काळजी करण्याचं कारण नाही. असे असले तरी लवकरात लवकर क्षेत्रीय कार्यालयातून आपल्या नोटा बदलून घ्यायला विसरू नका..!


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version