Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : बारामतीत कर्ज व्यवहारात गैरप्रकार करत केला २ कोटी १८ लाखांचा अपहार; शाकंभरी पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व सचिवांसह तिघांवर गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

बारामती शहरातील शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष, सचिवासह तिघांवर फसवणूक आणि ठेवीदार हित संरक्षण अधिनियमानुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष लेखापरिक्षक सुनील मथुरा काळे यांनी फिर्याद दिली आहे.

शांकभरी नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अनिल बबनराव गलांडे (रा. शांभवी, अशोकनगर, बारामती),  तत्कालिन सचिव मुकुंद महादेव गिजरे (कसबा, बारामती) आणि श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकुळवाडी, बारामती) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एप्रिल २०१० ते मार्च २०२२ या कालावधीत शाकंभरी पतसंस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अनिल गलांडे, सचिव मुकुंद गिजरे व मंजुश्री दुगम यांनी कर्जव्यवहारात गैरप्रकार करुन २ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार करणे, कर्ज खतावणीत चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा नियमांचे उल्लंघन करत विनातारण कर्ज देणे,  अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून संबंधितांनी संस्था आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. अधिकार आणि पदाचा गैरवापर करून संस्था आणि संभासदांचा विश्वासघात करत अपहार केल्यामुळे बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version