नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एम्स आणि आयसीएमआर या संस्थांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला.
आयसीएमआर चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.
यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या ‘ऑफ लेबल’ वापरास परवानगी देण्यात आली होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन वापर
प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.