Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : माजी खासदार विजय दर्डा यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था   

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळाप्रकरणी ४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोळसा घोटाळाप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे दर्डा विजय यांच्यासह त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांनाही चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, ज्येष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या संदर्भात पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्वांवर ठेवला होता. या घोटाळ्यात अनेक बड्या नावांचा समावेश आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित आरोपी रायपूर तुरुंगात आहेत. त्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव सूर्यकांत तिवारी, सुनील अग्रवाल आदींचा समावेश आहे.

न्यायालयाने १३ जुलै रोजी आरोप निश्चित केले होते. त्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा हे राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून दर्डा कुटुंबीय महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच कोळसा घोटाळ्यात दर्डा पिता-पुत्रांना शिक्षा झाल्याने त्यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version