मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा या परिषदेत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी या परिषदेत काम केले असून त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली होती.
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री म्हणून जीएसटी परिषदेत सदस्य होते. त्यावेळी त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्यांची दखल जीएसटी परिषदेकडून घेण्यात आली होती. त्यानंतर महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाचा कार्यभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला. त्यामुळे त्यांना या परिषदेत सदस्य म्हणून नेमण्यात आले होते.
अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अर्थ खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांचा जीएसटी परिषदेत समावेश करण्यात आला आहे. या परिषदेत जीएसटीसंदर्भातील विविध विषयांवर निर्णय घेतले जातात. त्यातून धोरण ठरवून कामकाज करण्यासाठी ही परिषद कार्यरत असते.