पुणे : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम-११ या ऑनलाईन गेममध्ये दीड कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. मात्र यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असून त्यानंतर झेंडे यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. याचा तपास पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी मागील तीन महिन्यांपासून ड्रीम ११ या अॅपवर टीम बनवायला सुरू केली होती. या दरम्यान, बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यासाठी त्यांनी या अॅपद्वारे टीम बनवली. सामना संपल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल तपासला. त्यामध्ये त्यांनी बनवलेली टीम पहिल्या क्रमांकावर आली होती. त्यातून त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
झेंडे यांच्या बक्षीसाची चर्चा सर्वत्र होत असतानाच आता त्यांच्या चौकशीची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन गेममध्ये सहभाग घेऊन बक्षीस जिंकणं त्यांना भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असून त्यानंतर झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे तपास देण्यात आला असून त्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करतील.
दरम्यान, झेंडे यांना दीड कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पोलिसांनीही याबाबत आता हालचाली सुरू केल्या असून झेंडे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.