Site icon Aapli Baramati News

बिग ब्रेकिंग : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी; मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांचा इशारा, आठवड्याभरात चारवेळा धमक्या..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी     

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. या आठवड्यात चौथ्यांदा मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली आहे. शादाब खान अशी धमकी देणाऱ्याने ओळख दिली असून त्याने केलेल्या ईमेलमध्ये पैशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून धमकीबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

आठवड्यात चौथ्यावेळी मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली आहे. अंबानी यांना शादाब खान याच्याकडून तीन धमकीचे मेल आले होते. शनिवार दि. २७ ऑक्टोबर रोजी धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने २०० कोटी रुपये आणि तिसऱ्या मेलमध्ये ४०० रुपये द्यावेत अशी मागणी केली. विशेष म्हणजे कोणीही माझा शोध घेऊ शकत नाही. पोलीसही मला अटक करू शकत नाहीत असेही त्याने या ईमेलमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून त्यांनी धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस या ईमेलची कसून चौकशी करत असून आयपी अॅड्रेसच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून बेल्जियम व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कंपनीकडूनही मदत मागण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती बेल्जियमचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र दिशाभूल करण्यासाठीही असा ईमेल वापरला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराचा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरु केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version