Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : आर्थिक विवंचनेतून कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या; १८० कोटींच्या कर्जामुळे नितीन देसाई होते तणावात..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच आर्थिक विवंचनेतून देसाई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची बाब आता समोर आली आहे. एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज नितीन देसाई यांनी घेतलं होतं. मागील वर्षभरापासून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. त्यातूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आता समोर येत आहे.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज पहाटे साडेचार वाजता कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट सृष्टीला हादरा बसला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अशातच आर्थिक अडचणींमुळे देसाई यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू असल्यामुळे नितीन देसाई तणावात होते अशीही माहिती समोर आली आहे.

नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलवाईज या कंपनीकडून १८० कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जाची पूर्तता करण्यात नितीन देसाई हे असमर्थ ठरले होते. कंपनीकडून सातत्याने कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. या दरम्यान, या कंपनीने नितीन देसाई यांनी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला होता. देसाई यांची मालमत्ता विकून त्यातून कर्जाची वसूली करावी अशी मागणी या कंपनीकडून करण्यात आली होती.

कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे नितीन देसाई मानसिक तणावात असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. एडलवाईज कंपनी ही आर्थिक पुरवठा करणारी मोठी संस्था आहे. या संस्थेकडून नितीन देसाई यांनी घेतलेलं १८० कोटी रुपयांचं कर्ज व्याजासह २५० कोटी पर्यंत पोहोचलं होतं. विशेष म्हणजे या कंपनीने दिलेला मालमत्ता जप्तीचा प्रस्तावही प्रलंबित होता. त्यामुळे नितीन देसाई यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं आता बोललं जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version