Site icon Aapli Baramati News

Big Breaking : केंद्राकडून तीन कृषी कायदे रद्द; शेतकरी आंदोलनाचे मोठे यश

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या वर्षभरापासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्राकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज सकाळी देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केला.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आज तीनही कृषी कायदे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याने या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे.

या संदर्भात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद अधिवेशन सत्रात तीन कृषी कायदे रद्द करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांसह सरकारने या तीनही कृषी कायद्याचे महत्व समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ती शेतकऱ्यांच्या लक्षात आली नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी देशात तीन कृषी कायदे आणले होते. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना अधिक बळ मिळावे. शेतमालास योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version