बारामती : प्रतिनिधी
कोकणाला अर्थमंत्री म्हणून नेहमीच मदत केली आहे. नारायण राणे हेदेखील आता केंद्रात मंत्री आहेत. एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा त्यांनीही केंद्रातून निधी आणावा आणि आम्हीही राज्य सरकारकडून निधी देवून कोकणचा कायापालट करु, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला. बारामतीतील एमईएस हायस्कूलमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिले.
अर्थमंत्री म्हणून मी नेहमीच कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कोकणसाठी आम्ही काय केले हे तिथल्या जनतेला ज्ञात आहे. विविध संकट असतील किंवा विकासकामे असतील त्यावेळी आम्ही मदत केली आहे. कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प आपण कोकणात मंजूर केले आहेत. ज्या-ज्या गोष्टी कोकणात करता येतील, त्या करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून अजित पवार यांनी आता नारायण राणेही केंद्रात मंत्री आहेत, लोकांची उणीधुणी काढण्यापेक्षा त्यांनीही केंद्रातून निधी आणावा असा टोला लगावला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगला प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यात यश आलं नाही. परंतु ज्यांना यश आलं आहे त्यांनी चांगली बँक चालवावी. त्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा असं म्हणत अजित पवार यांनी सिंधुदुर्ग बँकेच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकांची उणीधुणी काढण्यापेक्षा चांगलं काम करावं : अजितदादांचा नारायण राणेंना टोला
