Site icon Aapli Baramati News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंती निमित्त अभिवादन

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थितांना सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली.

            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी यांच्यामुळेच डिजीटल क्रांती झाली याची जाणीव ठेवली पाहिजे : अजित पवार

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणकक्रांती, डिजिटलक्रांती विचारपूर्वक घडवून आणली. ग्रामीण भागात दूरध्वनीसेवा पोहचवली.

पंचायतराज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती. कोरोना संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ त्यांच्या दूरदृटीमुळे शक्य झाले, याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे.

लोकप्रिय  पंतप्रधान म्हणून राजीव गांधी नेहमीच स्मरणात राहतील. राजीव गांधी यांची जयंतीनिमित्त सद्‌भावना दिवस साजरा होत आहे. सर्वांना सद्‌भावना दिनाच्या शुभेच्छा. यानिमित्ताने हिंसाचारमुक्त समाजाच्या निर्मितीस मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version