Site icon Aapli Baramati News

गुजरातमध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाची इमारत पाडणार; नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवी इमारत उभारणार

ह्याचा प्रसार करा

गांधीनगर : वृत्तसंस्था 

शहरातील माजी दिवंगत प्रधानमंत्री  इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेले ‘इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन’ पाडण्यात येणार आहे. त्याऐवजी नवीन इमारत बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात पंचायत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव परिषदेने मंजूर केला असून पुढील मंजुरीसाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. 

इंदिरा गांधी प्रशिक्षण भवनाची इमारत ३७ वर्षापूर्वीची  आहे. १९८३ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री माधव सोलंकी यांच्या कारकिर्दीमध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते या प्रशिक्षण भवनाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीला इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले होते. गुजरात पंचायत परिषदेमध्ये इंदिरा गांधी प्रशिक्षण भवनाची इमारत खूप जुनी झाली असून; नवीन इमारत बांधण्यास परवानगी द्यावी. तसेच या नव्या इमारतीस  नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव मंजूर झाला आहे. 

या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे जाणार आहे. त्यावर पटेल हे अंतिम निर्णय घेणार आहेत. तसेच प्रस्तावाबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना ही माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच या प्रस्तावाबाबत गृहमंत्री अमित शहा यांना माहिती देण्यात आल्यानंतर एक शिष्टमंडळ नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव समोर आल्यापासून काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजपने नवीन तर काहीच केले नाही. मात्र रेडिमेड असलेली विकायला काढत आहेत. भाजप सरकार ज्या गोष्टी विकू शकत नाही त्यांची नावे बदलत आहेत.

मध्यंतरी सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे क्रिकेट स्टेडियमला नाव दिले. आता पंचायत राज संस्थेचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्यात येईल. भाजपामध्ये राष्ट्रीय नेत्यांविषयी मनामध्ये विष पेरले आहे, असा आरोप मोढवाडिया यांनी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version