नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशात गदारोळ सुरू असून
प्रियंका गांधी यांना सरकारने दोन दिवसापासून अटकेत ठेवले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लखीमपूर जिल्ह्यात जाण्यासाठी रोखले जात आहे. अशातच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी ‘मी लखीमपुरला जाणारच’ असा निर्धार केला आहे.
लखीमपुर हिंसाचाराच्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लखीमपूरला जाणार असल्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, केंद्रातील भाजपाचे सरकार हुकुमशाहीचा वापर करत विरोधकांचा आवाज दबावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना या प्रकरणातून मंत्र्याच्या मुलाला वाचवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून येणारा दबाव दुर्लक्षित केला जात आहे. केंद्रातील भाजपाचे सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. आता तर शेतकऱ्यांना थेट चिरडले आहे.
देशाच्या सर्व राजकीय यंत्रणा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहेत. त्यांनी या यंत्रणेवर हुकूमशाही निर्माण केली आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये आले. मात्र लखीमपूरला गेले नाहीत. हे प्रकरण दडपले जात असून सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. काहीही झाले तरी आम्ही सर्वजण पिडीत कुटुंबाच्या सोबत आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.