बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि तालुक्यात ५ मेपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम होऊन रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन आणखी वाढणार की निर्बंध शिथिल होणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असून त्यानुसार नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामतीत मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ५ ते ११ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामध्ये केवळ औषध दुकाने आणि रुग्णालये सुरु ठेवण्यात आले. या काळात सकाळी ७ ते ९ या वेळेत दूध वितरणाला परवानगी देण्यात आली होती.
लॉकडाऊनचे पहिले सात दिवस झाल्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रशासनाने व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करत आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. या काळात किराणा आणि भाजीपाला घरपोच देण्यास मुभा देण्यात आली. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. गेल्या १४ दिवसात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या चांगलीच घटली आहे. या लॉकडाऊनचे चांगले परिणाम पहायला मिळाले आहेत.
आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून लॉकडाऊन वाढवला जाणार की आधीचे निर्बंध शिथिल होणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज या संदर्भात प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाणार असून त्यानुसार नवीन नियमावाली जाहीर केली जाणार आहे.