Site icon Aapli Baramati News

WARI : काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी; काटेवाडीत हजारो भाविकांनी अनुभवला मेंढ्यांचा रिंगण सोहळा..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मजलदरमजल करत पंढरपूरकडे निघाला आहे. आज बारामतीतील मुक्काम उरकून काटेवाडीत दाखल झालेला हा सोहळा सणसर येथे मुक्कामासाठी पोहोचला. या दरम्यान, काटेवाडीत परंपरेनुसार होत असलेलं मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं. हजारो भाविकांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.

काल रात्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत मुक्कामी दाखल झाला. आज पहाटे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते संत तुकोबाराय आणि संत ज्ञानोबांच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला. काकड आरती झाल्यानंतर पालखी काटेवाडीकडे मार्गस्थ झाली. दुपारी पालखी काटेवाडीत दाखल होताच परीट समाजातील बांधवांनी धोतरांच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं. त्यानंतर पालखी काटेवाडीत विसवली.

दुपारी सणसरकडे निघण्यापूर्वी काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मेंढ्यांचं रिंगण उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जातेय. काही वर्षांपूर्वी साथीच्या रोगामुळे मेंढ्या मृत्युमुखी पडत होत्या. त्याचदरम्यान संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काटेवाडीत आल्यानंतर मेंढ्यांचे रिंगण घालून साथीचा रोग दूर करण्याची प्रार्थना केली गेली. त्यानंतर ही साथ आटोक्यात आल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून हे रिंगण अखंडपणे सुरू आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version