बारामती : प्रतिनिधी
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत वीकएंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र राज्य शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर बारामतीत सुरू असलेला वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. तसेच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटही ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
बारामतीत मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. याचदरम्यान, बारामतीत वीकएंड लॉकडाऊनही सुरू करण्यात आला होता. मात्र आता राज्य शासनानेच निर्बंध शिथिल करण्याची भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र उर्वरीत ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले.
नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेत पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामतीतही निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. या दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बारामतीतील वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार बारामतीत आता नियमीतपणे बाजारपेठ सुरू राहणार आहे.
४ वाजेपर्यंतच सुरू राहणार बाजारपेठ
बारामतीतील वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. परंतु बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी ४ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे बारामतीतही त्या अनुषंगाने निर्बंध लागू राहणार आहेत. दुसरीकडे, बार, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.