बारामती : प्रतिनिधी
ज्यांच्या झोळीत काही नाही त्यांच्यासाठी दिवाळी अधिक गोड व्हावी या उदात्त हेतूने बारामतीत दान उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी अजिंक्य संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जातो. यंदा बारामती नगरपरिषदही अजिंक्य संस्थेसोबत या उपक्रमात सहभागी झाली असल्याची माहिती अजिंक्य संस्थेचे अध्यक्ष करण शहा (वाघोलीकर) यांनी दिली.
आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते गरजूंसाठी दान करावे आणि हे सर्व साहित्य गूंज या सेवाभावी संस्थेकडे गरजूंच्या मदतीसाठी सुपूर्द करायचे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. २०१६ पासून सातत्याने अजिंक्य संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला असून बारामतीकरांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना मदत करणे शक्य होत आहे.
रविवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत बारामती नगरपरिषदेसमोर, सिटी इन चौक आणि मोरगाव रस्त्यावरील दूध संघाचा पेट्रोल पंप अशा तीन ठिकाणी ही मदत स्विकारली जाणार आहे. यामध्ये सुस्थितीतील कपडे, ब्लँकेट, स्वेटर्स, स्कूलबॅग, पुस्तके, खेळणी अशा स्वरुपाच्या वस्तू मदत रुपाने आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व वस्तू संबंधितांना उपयोगी ठरल्या पाहिजेत यासाठी सुस्थितीतील वस्तूच या उपक्रमात दान कराव्यात असेही आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८२०८१०७२०० किंवा ९८५०६४०९९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.