बारामती : प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरचे सगळे निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे सगळ्यांना मास्क वापरणे बंधनकारक नाही. इच्छा असेल तरच मास्क वापरावे अशा सूचना दिल्या आहेत. तरीदेखील तुम्ही स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालव्याच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. आजपर्यंत अनेकांनी पाण्याबाबत निवेदने दिली आहेत. निवेदनातून आपण ज्या काही मागण्या करता त्या मागण्या पूर्ण करायचे आमच्या मनात नसते का? पण अगोदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी आणि नंतर मग शेतीसह इतर कामांसाठी ते पाणी वापरावे, अशी जयंत पाटील आणि आम्हा सगळ्यांची भावना असते.
सगळ्यांनी पाण्याची उपलब्धता तपासून उसाची लागवड करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मला कालच सोमेश्वरच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम घ्यायचा होता. परंतु काल दिवसभर इतर कार्यक्रमामुळे शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने कार्यक्रमासाठी आज सकाळीची वेळ द्यावी लागली. कुणाला तरी त्रास देण्यासाठी अशी सकाळची वेळ ठेवलीय असा चुकीचा अर्थ घेऊ नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.