बारामती : प्रतिनिधी
बारामतीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज तब्बल २८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
बारामतीत काल झालेल्या तपासण्यांपैकी २८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बारामती शहर आणि तालुक्यातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. बारामती शहरातील खासगी रुग्णालयांसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या शासकीय कोव्हिड रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मागील काही दिवसांत बारामतीत कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिकची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.
बारामतीत आतापर्यंत १० हजार ९५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८९१२ रुग्ण बरे झाले असून १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीत वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या हा सध्या काळजीचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी संयम बाळगत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.