आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामती तालुक्यात उद्या मध्यरात्रीपासून सात दिवस कडक निर्बंध लागू

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

हॉस्पिटल, औषध विक्री दुकाने वगळून सर्व बंद; दूध विक्री सकाळी ७ ते ९ पर्यंतच सूरू राहणार : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे 

बारामती : प्रतिनिधी 

बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बारामती शहर आणि तालुक्यात उद्या मध्यरात्रीपासून सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. या सात दिवसांत रुग्णालये, औषध विक्री वगळता अन्य सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते ९ या वेळेत दूध विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे.  

बारामती तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना व घेण्यात येणा-या निर्णयाबाबतची बैठक आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे,  तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्यश्री दाईगडे,  सिल्वर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे,  पोलीस निरिक्षक महेश ढवाण, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सभाजी होळकर, भाजपा चे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे,  जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, व्यापारी असोसिएनचे नरेंद्र गुजराथी, विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, मनसेचे ॲड. सुनिल पाटसकर, नगरसेवक संजय संधवी, एम.आय.डी.सी. चे अध्यक्ष धनंजय जामदार, कॉग्रेसचे ॲङ गालिंदे, शिवसेनेचे ॲङ राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रविण अहुजा, लॉजिंग संगटणेचे अध्यक्ष शैलेश साळुंके, भाजपचे शहराध्यक्ष सतिश फाळके, रासपचे शहराध्यक्ष ॲड. अमोल सातकर, बारामती शहरातील व्यापारी, औद्योगिक वसाहतीमधील प्रतिनिधी व डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात  येणाऱ्या विविध उपाययोजनाबाबत सर्व यंत्रणाशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात  कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी  आणखी कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.  

अशी असेल नियमावली 

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उद्या 4 मे 2021 रोजी रात्री 12:00 पासून  बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना/दुकाने पुढील 7 दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील, असे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. औद्योगिक वसाहती मधील ज्या कंपन्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्या सुरु राहतील. ज्या कंपन्यांनी  कर्मचा-यांची राहण्याची सोय कंपनीच्या कार्यक्षेत्रात केली आहे त्याही कंपन्या सुरू राहतील. इतर कंपन्या शासनाने पारित केलेल्या  नियमाप्रमाणे चालू राहतील. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी  व वैद्यकीय अधिकारी यांनी  कोव्हिड विषयचे आदेश, नियम व SOP नुसार कारवाई करावी असे, आदेशही  त्यांनी  दिले. 

सर्व आस्थापनाचे मालक, चालक आणि सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग या त्रिसूत्रीचे व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांनी  विनाकारण बाहेर फिरु नये असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us