Site icon Aapli Baramati News

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा : अजितदादांची सूचना

ह्याचा प्रसार करा

■ ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा
■ रेमडीसीवर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा
■ सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा

बारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडीसीवर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा. बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. शासनाने प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्याबाबत यावेळी सांगितले.

‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांर्भीयाने काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसूत्रीवर भर द्यावा तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आवाहन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version