सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि रामराजे सोसायटीच्या माध्यमातून १५० बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांसाठी स्थानिक पातळीवरच कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यानंतर आता कोव्हिड केअर सेंटरही सुरू होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची उपचारासाठी होणारी धावपळही थांबणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुलीच्या वसतिगृहात १०० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होणार आहे. त्यासाठी वसतीगृहात विविध सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कामेही सुरू करण्यात आली आहेत. तसेच वाणेवाडी येथील रामराजे सोसायटीच्या वतीने रामराजे जगताप स्मृतीभवनात ५० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू केले जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येत असून परिसरातील कोरोना बाधितांना स्थानिक पातळीवरच चांगल्या पद्धतीने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगून पुरुषोत्तम जगताप म्हणाले, मागील पंधरा दिवसांपूर्वी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत हे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले जाईल. त्यामुळे परिसरातील अनेक गावातील रुग्णांची सोय होणार आहे.